Shirur News : रांजणगाव गणपती येथुन कडब्याच्या 75 पेंढ्या चोरीला; चोरटा ‘सिसीटीव्ही’ त कैद

निमोणे : शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असुन दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नाहीत. त्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढतं आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 75 कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील शेतकरी प्रताप माणिक फंड यांच्या शेतातुन दिवसाढवळ्या बुधवार दि २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती ते करडे अष्टविनायक महामार्ग लगत संतोष वजन काट्या समोरुन हा भामटा कडबा चोरी करुन जाताना ‘सिसीटिव्ही’ त कैद झाला असुन अष्टविनायक महामार्गाने तो बाभुळसर खुर्द मधुन करडे गावाच्या दिशेने गेला आहे.
या चोरट्याकडे. काळ्या रंगाची दुचाकी एक्टिवा गाडी असुन त्याने पिवळा शर्ट घातलेला आहे. या भामट्याने प्रताप माणिक फंड यांच्या शेतातुन ७५ पेक्षा जास्त कडब्याच्या पेंढ्या चोरलेल्या असुन जर या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर प्रताप फंड यांच्या ९१६८०००९९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.





