Karad News : कराडमधील वृद्ध शिक्षिकेला दोन कोटीचा गंडा; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याची खोटी भीती दाखवली
Karad News : सायबर भामट्यांनी कराड शहरातील एका ७४ वर्षीय एकाकी वृद्ध निवृत्त शिक्षिकेला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून तब्बल २ कोटी ३ लाख ५० हजार रुपयांना लुटल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Karad News : कायदेशीर कारवाई आणि अटकेची भीती दाखवून सायबर भामट्यांनी कराडमधील ७४ वर्षीय निवृत्त शिक्षिकेला २ कोटी ३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. पोलिसांचा गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉल करणाऱ्या संशयिताने दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. (Karad News)
तपासाच्या नावाखाली बँकांतील ठेवी, गुंतवणूक आणि एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढून रक्कम पाठवण्यास भाग पाडले. सरकारी यंत्रणांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Karad News0
ओगलेवाडी रस्त्यावरील पूर्व गजानन हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या या वृद्धेने याबाबत फिर्याद दिली आहे. रयत शिक्षण संस्थेत २९ वर्षे शिक्षिका म्हणून त्यांनी सेवा बजावली. त्यांनी २००७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पतीच्या निधनानंतर त्या घरी एकट्याच राहतात. (Karad News)
आयुष्यभराची बचत, निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम आणि विविध गुंतवणुकींच्या माध्यमातून त्यांनी भविष्याची आर्थिक तरतूद केली होती. त्यांना ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. (Karad News)
पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या या व्यक्तीने स्वतःची ओळख संदीप राव अशी करून दिली. त्या वृद्धेच्या नावावर चार राज्यांत बँक खाती उघडण्यात आली असून, कॅनरा बँकेतील एका खात्यातील अडीच कोटी रुपये दहशतवाद्यांना पुरवले जात असल्याचे त्याने सांगितले. (Karad News)
या प्रकरणात अटक होऊ शकते, अशी धमकीही दिली. बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने वृद्धा घाबरल्या. संशयिताने कोणालाही याबाबत माहिती न देण्याची ताकीद दिली. त्यांचे फोन मॉनिटर केले जात असल्याचे सांगून दर दोन तासांनी आपण घरी सुरक्षित असल्याचा संदेश पाठवण्यास सांगितले. (Karad News)
त्याच्या सूचनेनुसार त्या घरातील स्वतःचे फोटोही पाठवत होत्या. वृद्धेचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने बँकांतील सर्व रक्कम तपासणीसाठी पाठवण्यास सांगितले. पैसे परत मिळतील, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी आयसीआयसीआय बँकेतील बचत खाते, आवर्ती ठेव आणि मुदत ठेवी मोडून १ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे संशयिताने सांगितलेल्या खात्यावर पाठवले. (Karad News)
यानंतर संशयिताने अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाने बनावट पावती तयार करून व्हॉट्सॲपवर पाठवली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आणि क्यूआर कोडही होता. त्यामुळे पैसे अधिकृत तपासणीसाठी जमा झाल्याचा वृद्धेचा समज झाला. (Karad News)
७ ऑक्टोबर रोजी संशयिताने पुन्हा संपर्क साधून दुसऱ्या बँकेतील आणि पोस्टातील गुंतवणूक काढण्यास सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या नावाने तपासणीनंतर पैसे परत देण्याचे आश्वासन देणारे कथित हमीपत्रही पाठवण्यात आले. (Karad News)
त्यावर विश्वास ठेवून वृद्धेने आणखी ४९ लाख रुपये संशयिताने सांगितलेल्या खात्यावर वर्ग केले. ८ ऑक्टोबर रोजी एलआयसीमधील गुंतवणुकीची रक्कम पाठवण्याची मागणी करण्यात आली. मुदतपूर्व पैसे मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पॉलिसीवर कर्ज काढण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा केल्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी नऊ लाख रुपये अन्य खात्यावर पाठवले. (Karad News)
पैसे परत मिळत नसल्याने वृद्धेने संशयिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. १० ऑक्टोबर रोजी त्यांना व्हॉट्सॲपवर कथित पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पाठवण्यात आले. पीएफआय आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी होऊन त्या निर्दोष आढळल्याचा मजकूर त्यावर होता. (Karad News)
नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या तपासाचाही उल्लेख करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी पुन्हा संपर्क साधूनही पैसे परत मिळाले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी सुनेला घडलेला प्रकार सुनेला सांगितला. (Karad News)
त्यानंतर सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार करण्यात आली. या प्रकरणी संशयित संदीप राव याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मोबाइल क्रमांक, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Karad News)


