पुण्यात पक्ष्यांच्या 74 प्रजाती

पुणे – नदीकाठी वावरणाऱ्या घारी, पाणथळ जागीचे बगळे/बदके, शहरीकरणात हरवत चाललेल्या चिमण्या, पोपट, साळुंक्या आणि आज नकोसे होणारे पारवे पक्ष्यांच्या अशा तब्बल 74 प्रजाती पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आढळल्या आहेत. महाविद्यालयातर्फे या पक्षी वैभवाची नोंद घेणारी जैवविविधतेची माहिती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे.
अगदी मध्यवस्तीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांच्या कुशीत लाभलेले स्थान आणि वर्षानुवर्षे जपलेली वृक्षसंपदा यामुळे पाणवठा आणि रान-पक्ष्यांची विविधता एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते. या संपन्न जैवविविधतेची माहिती संकलित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून नव्या पिढीच्या पक्षीमित्रांच्या मदतीने पक्षीनिरीक्षण करण्यात आले. या नोंदीमधून एकंदर 74 प्रजातींचे पक्षी आढळले. त्यांची वैज्ञानिक नावे, इंग्रजी आणि मराठीतील नावे आणि अधिवास याबद्दलची माहिती आता महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या जैवविविधता नोंदवहीचे ऑनलाइन प्रकाशन झाले. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते आणि वनविभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक एन. वासुदेवन यांच्या उपस्थितीत ही सूची प्रकाशित झाली.
यावेळी संचालक प्राध्यापक बी. बी. अहुजा, पर्यावरणविभाग प्रमुख डॉ. महेश शिंदीकर, राज्य वन्य प्राणी मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, जैवविविधता विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकुर पटवर्धन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळातील वनस्पती तज्ज्ञ सदस्य प्रा. मिलिंद सरदेसाई, पुणे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, बी. एन. एच.एस. या संस्थेचे सहायक संचालक डॉ. राहूल मुंगीकर, निखील जोशी, डॉ. पंकज कोपर्डे, डॉ. सचिन पुणेकर, केतकी घाटे आदी उपस्थित होते.





