लघुउद्योगांना शेअर बाजारावरील नोंदणीसाठी सवलत

मुंबई- लघु उद्योगांना शेअर बाजारावर नोंदणी आता स्वस्त होणार आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने लघुउद्योगासाठी नोंदणी शुल्क 0.25 टक्क्यांनी कमी केले आहे.
जे लघुउद्योग सध्या अस्तित्वात आहेत आणि जे आगामी काळात नोंदले जाणार आहेत या सर्वासाठी शुल्कात सवलत लागू होणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या लघु उद्योग व स्टार्टअप विभागाचे प्रमुखाचे अजय ठाकूर यांनी सांगितले की, यामुळे लघुउद्योजकांना शेअर बाजारावर नोंदणी करून भांडवल उपलब्ध करणे सोईचे जाणार आहे.
मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने 2012 मध्ये लघु उद्योजकासाठी वेगळा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 322 कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या कंपन्यांनी यावेळी या व्यासपीठावरून 3 हजार 279 कोटी रुपयांचे भागभांडवल उभा केले आहे. स्टार्ट अप् प्लॅटफॉर्मवर पाच कंपन्यांची नोंदणी झाली आहे.





