शासनाने एसटीलाही ‘आत्मनिर्भर’ करण्याची गरज

कामगार संघटनेची शासनाकडे मागणी
पुणे – केंद्राच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला जो वाटा मिळणार आहे, त्यातील काही रक्कम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला द्यावी. त्याबाबतचा ठोस आराखडा तयार करावा, अशी मागणी एस.टी. कामगार संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात आले आहे. करोनाचा संसर्गामुळे खासगी वाहने बंद आहेत. अत्यावश्यक सेवेतील एस.टीमुळेच मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लॉकडाऊनच्या काळात एस.टी.ची संपूर्ण सेवा बंद आहे. त्यामुळे महामंडळ आता आणखी तोट्यात गेले आहे. या महामंडळालासुद्धा आर्थिकदृष्ट्या निर्भर बनविण्यासाठी केंद्राच्या पॅकेजमधील काही वाटा दिला, तर एक ठोस आराखडा तयार करता येऊ शकतो. त्यातून एस.टी. फायद्यात आणता येईल, असे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे.




