ED Raid : ईडीच्या छाप्यात ७३ कोटी जप्त; कंपनी मालकाने उचललं टोकाचं पाऊल !

ED Raid – जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवरील छाप्यानंतर, कंपनीचे संचालक किशन मोदी यांची पत्नी ३१ वर्षीय पायल मोदी हिने विष प्राशन केले. गुरुवारी रात्री त्यांना गंभीर प्रकृतीत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणाचा तपास अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांना पायलची कथित सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि इतर पाच जणांवर आरोप केले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. भोपाळ, सेहोर आणि मुरैना येथील कंपनीच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान, ईडीला कंपनीच्या संचालकांकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे.
गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्याच्या दुसऱ्या दिवशी, जयश्री गायत्री फूड प्रोडक्शन कंपनीचे मालक किशन मोदी यांच्या पत्नी पायल मोदी यांनी उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंपनी आणि ऑपरेटर्सच्या परिसरात केलेल्या चौकशीदरम्यान, ईडीला अनेक गुन्हेगारी कागदपत्रे, २५ लाख रुपये रोख, बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर सारख्या लक्झरी कार तसेच विविध कंपन्यांच्या नावावर ६६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता सापडली आहे. ईडीला ६.२६ कोटी रुपयांची एफडीदेखील सापडली आहे.





