Nevasa : माजी सरपंचावर हल्ला होऊन ७२ तास उलटले, तरी आरोपी मोकाटच! नेमकं काय घडलं?
Nevasa : या सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या माजी सरपंच विठ्ठल शिंदे यांच्यावर भररस्त्यात लोखंडी गजाने हल्ला झाला.गुन्हा दाखल तरी आरोपी अद्यापही बिनधास्त फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेवासा : तक्रार करणाऱ्यालाच मारहाण, दमबाजी आणि सोन्याची चैन हिसकावून नेऊनही नेवासे पोलिसांना जाग येत नाही का? असा संतप्त सवाल आता चिंचबनसह संपूर्ण नेवासा तालुक्यातील जनतेतून उपस्थित करून संताप व्यक्त केला जात आहे. या सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या माजी सरपंच विठ्ठल शिंदे यांच्यावर भररस्त्यात लोखंडी गजाने हल्ला झाला. गुन्हा दाखल तरी आरोपी अद्यापही बिनधास्त फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दिवसाढवळ्या वाळू, रात्री दादागिरी!
दि.१५ नोव्हेंबरला प्रवर नदीपात्रातून जेसीबीने वाळू वाहतूक सुरू होती. रस्ता फुटतोय, गावाचे नुकसान होतंय म्हणून माजी सरपंचाने जाब विचारला, तर त्यालाच शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दि.१६ नोव्हेंबरला लेखी तक्रार दिली, तर त्याच दिवशी सायंकाळी दुर्गादेवी मंदिराजवळ विना नंबरच्या काळ्या स्कॉर्पिओतून येऊन हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना काय साधी भांडणाची नाही? वाळूतस्करांनी दाखवलेली उघड दादागिरी आहे. “तक्रार करशील तर असाच प्रसाद मिळेल” असा संदेश संपूर्ण तालुक्याला देण्याचा हा वाळूतस्करांनी केलेला प्रयत्न आहे.
पोलिसांना पडलेले ५ प्रश्न – उत्तरे कधी देणार?
विना क्रमांकाची स्कॉर्पिओ कोणाची? भररस्त्यात, मंदिराजवळ विना नंबरची गाडी फिरते, ती पोलिसांना सापडत नाही, हे कसे शक्य आहे? त्या गाडीचा मालक कोण, हे शोधणे एवढे अवघड आहे का?, हल्लेखोरांना अटक का नाही? फिर्यादीत नावे स्पष्ट आहेत. सोमनाथ लष्करे, अजय लष्करे, राहुल धनवटे, कैलास पवार तरीही आरोपींना अटक का होत नाही? पोलीस हे आरोपी स्वतःहून शरण येतील याची वाट पाहत आहे का?,चेन कुठे गेली? एक तोळ्याची सोन्याची चैन हिसकावली गेली. ती हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी नेमके काय प्रयत्न केले?,वाळू वाहतूक अजूनही सुरूच कशी? तक्रार देऊनही प्रवरा नदीपात्रातून वाळू वाहतूक थांबली का जात नाही?,सामान्य माणसाने तक्रार करायची कुणाकडे? आज माजी सरपंचावर हल्ला झाला.उद्या एखाद्या सामान्य शेतकऱ्याने तक्रार केली तर त्याची काय अवस्था होईल? पोलिस संरक्षण देणार की फक्त गुन्हा दाखल करून कागदावर नोंद करणार?
“पोलीस फक्त कागदी कारवाई करतात” – नागरिकांत संताप!
गावागावात एकच चर्चा आहे “पोलीस फक्त गुन्हा दाखल करतात,कारवाई करत नाहीत.” स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली की नेवासे पोलीस जागे होतात, असा अनुभव यापूर्वीही आलेला आहे.मग नेवासे पोलिसांचे खरे काम काय? गुन्हा घडल्यावर पंचनामा करणे एवढेच आहे काय? वाळूतस्करांना एवढी हिंमत कुठून येते? त्यांच्या मागे कोणाचे राजकीय,आर्थिक पाठबळ आहे? याचा शोध घेण्याऐवजी पोलीस मूग गिळून गप्प का आहेत?
नेवासेकरांची ठाम मागणी
हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये करावी, विना क्रमांकाची स्कॉर्पिओ व जेसीबी जप्त करावी, प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा व वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी,तक्रारदार विठ्ठल शिंदे यांना पोलीस संरक्षण द्यावे. पोलिसांनी आता केवळ “तपास सुरू आहे” असे सांगून वेळ मारून नेऊ नये, अन्यथा सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वासच उडून गेल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी वाळूतस्करांची दादागिरी मोडीत न काढल्यास जनतेतून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.





