Gujarat News : ढिगाऱ्याखाली दबून ७ मजूरांचा मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना

Gujarat News : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका कंपनीची भूमिगत टाकी खोदत असताना मजुरांच्या अंगावर अचानक वरील माती कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून ७ मजुरांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे मेहसाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेहसाणाच्या जसलपूर जवळील एका गावात हे सात मजूर एका कंपनीसाठी भूमिगत टाकी खोदण्याचे काम करत होते.
हे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. पण शनिवारी दुपारी खोदकाम सुरु असताना अचानक वरील माती मोठ्या प्रमाणात आतमध्ये ढासळली. त्यामुळे काही क्षणात आतमध्ये काम करणारे मजुर त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरु केले. पण त्या मजुरांना वाचवण्यास यश आले नाही.





