महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरालगत असणाऱ्या काळे वस्ती येथील झुडपांमध्ये अंदाजे ७ ते ८ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. वनविभाग महाबळेश्वर व सह्याद्री प्रोटेक्टर्स मार्फत रेस्क्यू करण्यात आले असून त्याला मानवी वस्ती पासून दूर नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले आहे. येथील काळे वस्ती नजीकच्या झुडपांमध्ये अजगर असल्याचे वनविभागाचे वनमजूर संतोष काळे यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी असलेल्या वस्तीमध्ये पाळीव कोंबड्या पाळीव कुत्री आहेत. हा अजगर भक्ष्याच्या शोधात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वनमजूर संतोष काळे यांनी सदरची बाब वनपाल सुनील लांडगे व सह्याद्री प्रोटेक्टर्स च्या सदस्यांना कळवली. या घटनेची माहिती मिळताच सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला रेस्क्यू केले. वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्स टीम मार्फत अजगराला रेस्क्यू करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या आधी देखील प्रतापगड भागात बऱ्याचवेळा अजगर आढळले असून महाबळेश्वर शहरानजीक प्रथमच अजगर हा साप आढळला आहे. या वेळी वनविभागाचे वनपाल सुनील लांडगे, वनमजूर संतोष काळे, वनमजूर वाघदरे निलेश सपकाळ, सह्याद्री प्रोटेक्टर्स चे देवेंद्र परदेशी, हर्ष साळुंखे व सचिन गुजर आदींनी रेस्क्यू कार्य यशवी पार पाडले.