अकलूज : सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर व नावलौकिक असलेल्या अकलूज नगरपरिषद निवडणुकीला अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र विकास सेना पक्ष व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत जेवढे अर्ज आले ते घेण्यात आले.रात्री उशिरापर्यंत काम चालू होते. नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा अनिल साठे (महाराष्ट्र विकास सेना), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा आडगळे, प्रतिभा गायकवाड, भारतीय जनता पक्षाकडून पूजा कोतमिरे, वंचित बहुजन आघाडी उमा कांबळे व उषा कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस) व दिव्यांनी रास्ते, अशी सात जणांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कोणताही गाजावाजा न करता आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशांत बनसोडे व सचिन पाटील हे कामकाज पहात आहे. अकलूज नगरपरिषदेचे पहिले नगरसेवक होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अकलूज ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,तसेच मोहिते पाटील या मातब्बर राजकीय घराण्यातील चौथ्या पिढीतील सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी तर माने पाटील कुटुंबातील माजी ग्रा.प.सदस्य ज्योतीदेवी माने पाटील, गिरिराज माने पाटील आदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गिरीश शेटे यांचा नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख जयसिंह मोहिते पाटील,किशोरसिंह माने पाटील,ऋतुजादेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील व देवण्या मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत होते. तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार पाटील, माजी आमदार राम सातपुते आदी नेतेमंडळी उपस्थित होते.