काबुल – काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक झालेल्या गोळीबारात आज आणखी सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेले सर्व जण अफगाणि नागरीक आहेत अशी माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे. हा गोळीबार इस्लामिक स्टेटशी संबंधीत असलेल्या गनिमांनी केल्याचे वृत्त आहे. तथापि काबुल विमानतळाच्या दिशेने होणारी गर्दी रोखण्यासाठी तालिबानी गनिमांनीही तेथे आज रविवारी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
काबुल विमानतळावरून निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या विमानांवर हल्ले करण्याची इस्लामिक स्टेटच्या हस्तकांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. काबुल विमानतळाच्या बाहेर तालिबानी गनिमांचा पहारा आहे. ते प्रत्येक नागरीकांची झडती घेऊन त्यांना सोडत आहेत. अफगाणि नागरीक देशाबाहेर जाऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न आहे असे सांगण्यात येते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकन दुतावासाने शनिवारी नागरीकांना एक नवा इशारा संदेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधीकडून सुचना येईपर्यंत आता कोणीही नागरीकांनी काबुल विमानतळाच्या दिशेने येऊ नये. काबुल मध्ये हा इस्लामिक स्टेटचा जो अचानक हिंसाचार उद्भवला आहे त्या विषयी मात्र अमेरिकेने अजून भाष्य केलेले नाही. पण इस्लामिक स्टेटचा हा धोका गंभीर स्वरूपाचा आहे हे मात्र त्यांनी नमूद केले आहे.