पुणे जिल्हा | चांगल्या पावसामुळे डिंभे धरणात ६९.९० टक्के पाणीसाठा

मंचर, (प्रतिनिधी) – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण सध्या सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे ६९.९० टक्के भरले आहे .पावसाचा वेग गेल्या दोन दिवसापासून मंदावला आहे. डिंभे धरणावर अवलंबून असणारे पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धरण केंव्हा भरेल, याकडे शेतकऱ्र्यांचे लक्ष लागले आहे.
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे या ठिकाणी घोडनदीवर असणारे डिंभे धरण सोमवार, दि.२९ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ६९.९० टक्के भरले आहे. पावसाचा चांगला जोर राहिला तर धरण लवकर भरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात चागला पाऊस झाल्यानंतर १३.५० टीएमसी पाण्याचा साठा होतो.
पाण्याचा उपयोग डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव,शिरूर तालुक्यातील गावांना होतो. घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून आंबेगाव, शिरूर तालुक्यातील अनेक गावांना होतो. त्याचप्रमाणे डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून हे पाणी येडगाव धरणात जाते व तेथून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तर नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथपर्यंत धरणातील पाणी जाते. त्यामुळेच पुणे, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा उपयोग होतो.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर,जुन्नर हे तीन तालुके, नगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड हे चार तालुके तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या एका तालुक्यात या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी होत असतो. त्यामुळे एकंदरीतच धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून आहे.
त्यामुळे धरण ६९.९० टक्के भरल्याने नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरुवार, दि.२५ रोजी धरणात पाणी साठा ४९.९० टक्के, शुक्रवार दि.२६ रोजी धरणात पाणीसाठा ६१.७१ टक्के,शनिवार दि.२७ रोजी धरणात पाणीसाठा ६५.२२ टक्के, रविवार दि.२८ रोजी धरणात पाणीसाठा ६७.५९ टक्के आणि सोमवार, दि. २९ रोजी धरणात पाणी साठा ६९.९० टक्के पाणीसाठा झाला आहे.
माणिकडोह धरणात पाणी सोडावे
डिंभे धरणाच्या बोगद्याचा वाद सध्या सुरू असून माणिकडोह धरणात पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तरीही एकंदरीतच त्यामुळे डिंभे धरण हे चर्चेत आले आहे. तसं पाहिलं तर डिंभे धरणातील पाणी कालव्याद्वारे जुन्नर तालुक्यातील धरणात जाते. तेथून ते नगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जाते.
परंतु बोगद्याचा अट्टाहास का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. त्यामुळे एकंदरीत डिंभे धरण १०० टक्के भरल्यानंतर अतिरिक्त होणारे पाणी हे नदीतून वाहून जाण्याऐवजी डाव्या कालव्यातून जुन्नर तालुक्यातील धरणांमध्ये साठवावे व त्याचा उपयोग उन्हाळ्यात करावा, येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.





