PMRDA : मोईतील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त
PMRDA : पीएमआरडीएकडून ३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्तची कारवाई

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत पत्राशेडविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली.
सलग दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आली. पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
मोई येथील ६८ गट क्रमांकांमधील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांविरोधात धडक कारवाई करत, सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रात पसरलेली तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे भुईसपाट केली.
सलग २० तास या कारवाईसाठी ६५० पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) ५० जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाचे ३० जवान तैनात करण्यात आले होते.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. १२ पोकलॅन, १२ जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर, हायड्राक्रेन आणि गॅसकटर यांसारख्या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने पत्राशेड व बांधकामे हटविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका, खेड येथील विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
‘पीएमआरडीए’च्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड अथवा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. मोई परिसरातील कारवाई ही धडक मोहिमेचा एक भाग आहे. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. ‘पीएमआरडीए’तर्फे आगामी काळातही अशी कडक कारवाई सुरूच राहील.” – डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.





