Pune News | लोणी काळभोरमध्ये 66.20 टक्के मतदान

लोणी काळभोर, -शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या निवडणुकीत शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. अपवाद वगळता कुठेही वादाचे गालबोट लागले नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. हवेली तालुक्यांतील लोणी काळभोर मध्ये 66.20 टक्के मतदान झाले.
प्रचाराच्या रणधुमाळीत करण्यात आलेल्या आरोप – प्रत्यारोपांमुळे उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार राजाने आपले बहुमुल्य मत देवून आमदार पदासाठी उभ्या असलेल्या 11 उमेदवारांचे नशीब आज मतदान यंत्रात बंद केले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांत यावर्षी निवडणूकीमध्ये पारंपारिक प्रचाराला आधुनिकतेची जोड देण्यात आल्यामुळे प्रचाराची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) विद्यमान आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्ञानेश्वर कटके या उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आरोप प्रत्यारोप करत मतदान करण्याचे आवाहन केले होते.
आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळावे यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करताना दिसत होते. बहुतांश मतदान केद्रावर रांगा लागल्या होत्या. अपंग व वृध्द मतदारांनीही मतदान केले. सायंकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपली त्यावेळीही मतदार मतदानासाठी येत होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार बहूमताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिरूर हवेली मतदारसंघात गेले पंधरा दिवस जोरदार प्रचार चालू होता. प्रचारा दरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादाच्या घटना घडल्या. मात्र त्यांचे स्वरूप व तीव्रता वाढली नाही.





