अपघातात मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबियांना मिळणार ६५ लाख; समुपदेशनात तडजोड

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या कुटुबियांना ६५ लाख रुपये मिळणार आहे. वडगाव मावळ येथील जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी केलेल्या समुपदेशनात हा दावा निकाली निघाला.
या प्रकरणात अर्जदारांतर्फे ॲड. सुभाष देसाई यांनी, तर, टाटा एआयजी जनरल विमा कंपनीतर्फे ॲड. सुरेंद्र दातार व श्रध्दा बनछोडे आणि अजिंक्य कुलकर्णी यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
१५ डिसेंबर २०२१ रोजी ट्र्क व दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मारूती सोपान गोरे यांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर भरपाई मिळावी, यासाठी पत्नी सविता, मुली स्नेहल व श्रावणी, आई अनुसया आणि वडील सोपान यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वडगाव मावळ येथील मोटार अपघत न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.
त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यांनी ३ वर्षाचे आयकर भरले आहे आणि असलेल्या अवलंबत्वाचा विचार करून दीड कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती.
सुरूवातीला जिल्हा न्यायाधीश एस.एस.पल्लोड यांच्या न्यायालयात हा दावा दाखल होता. त्यानंतर गांधी यांनी यामध्ये समुपदेशन केले. त्यावेळी ६५ लाख देण्याची तडजोड झाली. हा दावा निकाली निघाला





