पुणे | एएफएमसी च्या ‘ग्रॅज्युएट विंग’ चा ६२ वा वर्धापन दिन साजरा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज मध्ये रविवारी ‘ग्रॅज्युएट विंग’ चा ६२ वा वर्धापन दिन साजरा केला. ४ ऑगस्ट १९६२ मध्ये तत्कालिन संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन यांनी या कॉलेजचे उद्घाटन केले होते.
या महाविद्यालयातून ७,६०० हून अधिक डॉक्टर पदवीधर होऊन सशस्त्र दलामध्ये राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सेवा दिली आहे. एएफएमसी ला प्रेसिडेंट फ्लॅगने १ डिसेंबर २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले आहे.
एएफएमसी चे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल संदीप थरेजा, महाविद्यालयाचे पहिले माजी विद्यार्थी ब्रिगेडियर मुख्तार आलम (निवृत्त), अधिष्ठाता मेजर जनरल गिरीराज सिंग आणि अन्य मान्यवरांनी ‘प्रेरणा’ स्थळ येथे पुष्पहार अर्पण केला.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात उत्साहवर्धक वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच माजी विद्यार्थी आणि वैद्यकीय कॅडेट्स यांच्यातील उत्साही फुटबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट सामने, त्यांच्यातील सौहार्द आणि स्पर्धात्मक भावना प्रदर्शित करण्यात आली.
वैद्यकीय कॅडेट्स, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहित्यिक उपक्रमांचा समावेश असलेल्या ‘धन्वंतरी’ या महाविद्यालयीन मासिकाच्या ५९व्या आवृत्तीचे प्रकाशनही लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महासंचालक सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा आणि वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी संस्थेला आणि तेथील प्राध्यापकांना आणि कॅडेट्सना शुभेच्छा दिल्या.




