पिंपरी | मोकातील ६२ आरोपी मोकाट

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यसाठी पोलिसांकडून संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. गेल्या साडे सहा वर्षांत 139 टोळ्यांवर मोकाची कारवाई केली. यामध्ये निष्पन्न झालेल्या 941 पैकी 879 आरोपींना अटक केली आहे. मात्र अद्यापही मोकातील 62 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेण्यासाठी अनेक भागात संघटीत गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. कधी कधी तर या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून हाणामारी आणि खुनाच्या घटना घडल्या आहेत.
औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांकडून टेंडर मिळविण्यासाठी दहशतीचा वापर केला जातो. यासाठी कंपनीच्या अधिका-यांना धमकावण्यात येते. यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपणच या एरियातील भाई आहोत, हे दाखविण्यासाठी वाहनांची तोडफोड करतात. दुकानदारांकडून हप्त्यांची मागणी करतात. याबाबत पोलीस वेळोवेळी गुन्हे दाखल करीत असतात. मात्र जेव्हा संघटीत गुन्हेगारी उदयास येते त्यावेळी पोलिसांकडून कडक पावले उचलली जातात. अशा टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी मोकाची कारवाई केली जाते.
पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेले आरोपी अनेकदा गुपचूप शहरात येऊन जातात. अनेकदा प्रतिबंधात्क कारवाई केलेल्या आरोपींनी गुन्हे देखील केले आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करणे, पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचे असते.
मोकाची कारवाई केल्यास काय होते?
संघटीत गुन्हेगारी टोळीवर मोकाची कारवाई केल्यास या टोळीतील सदस्य किमान तीन वर्षांकरिता तुरूंगात जातात. यामुळे ज्या परिसरात त्यांची दहशत असते ती दहशत संपुष्टात येते. मोकातील जे आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. ते अटक टाळण्यासाठी भूमिगत होतात. त्यामुळे त्यांचीही दहशत कमी होते.
गुन्हे शाखेकडून शोध सुरूच
पोलीस कारवाईची चाहूल लागताच काही मोकातील आरोपी पळून जातात. आपले नाव, ओळख लपवून दुस-या शहरात जाऊन राहतात. अशा आरोपींचा गुन्हे शाखेकडून शोध सुरू असतो.
वर्ष मोका लावलेल्या टोळ्या निष्पन्न आरोपी अटक आरोपी पाहिजे आरोपी
2018 01 07 07 00
2019 09 59 57 02
2020 09 50 50 00
2021 26 187 180 07
2022 18 129 128 01
2023 51 361 329 32
2024 25 148 128 20
——————-
एकूण 139 941 879 62





