पहलगाममधील भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू; पुण्यातील दोघांचा समावेश तर डोंबिवली…

Pahalgam Attack | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
डोंबिवली तिघांचा मृत्यू
डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या धक्कादायक वृत्ताने नातेवाइकांवर दुखाचा डोंगर कोसळला. तिघांचेही नातेवाईक तातडीने काश्मीरकडे रवाना झाले आहेत.
पुण्यातील दोघांचाही मृत्यू
तर पुण्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राज्यातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर गेला आहे.
पनवेलमधील एकाचा मृत्यू
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला आहे. तर सुभोद पाटील आणि माणिक पाटील हे या हल्ल्यात जखमी झाले. दोघांवर जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डिसले यांच्यासह पनेवलमधील ३९ जण जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. यातील सर्वजण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पहलगाम येथील हल्ल्यात पोलिसांच्या वेशात आलेल्या १० दहशतवाद्यांनी नाव विचारले, आयडी पाहिले आणि पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीर खोऱ्यात पूलावामा हल्ल्यानंतर पहलगाममधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. Pahalgam Attack |
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
सूत्रांनुसार, या हल्ल्यात 27 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे, तर अनेक जण जखमी आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा:





