Naxalites killed : छत्तीसगढमध्ये ६ नक्षली चकमकीत ठार; रायफल्स आणि स्फोटकांचा साठा जप्त

Naxalites killed – छत्तीसगढमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक नारायणपूर जिल्ह्यात झडली. अबूझमाड विभागातील जंगलात नक्षलींचे अस्तित्व असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर विविध सुरक्षा दलांच्या पथकांनी नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून नक्षलींनी गोळीबार सुरू केला.
त्याला सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये झालेली जीवितहानी नक्षलींना हादरा देणारी ठरली. चकमकस्थळावरून सुरक्षा दलांनी नक्षलींकडील रायफल्स, इतर शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.
केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादमुक्त बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यातून सुरक्षा दले नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवत आहेत. त्या मोहिमांचा भर प्रामुख्याने नक्षलींचे प्रमाण अधिक असणाऱ्या छत्तीसगढमध्ये आहे.
सुरक्षा दलांच्या मोहिमांना लक्षणीय यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षात त्या राज्यात आतापर्यंत २२१ नक्षली मारले गेले आहेत. त्याशिवाय, अनेक नक्षलींना अटक करण्यात आली आहे.





