हिंसाचाराच्या 6 दिवसानंतर नागपूरमधील जनजीवन पूर्ववत, संचारबंदी पूर्णपणे हटवली

Nagpur Violence | नागपूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सहा दिवसांनी म्हणजे रविवारी नागपूरमधील उर्वरित ४ भागांमधून संचारबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे.
नागपूर शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. संचारबंदी लावल्याने हिंसाचारग्रस्त भागात पोलीस बंदोबस्तामुळे वर्दळ थांबली होती. परंतु आता शहर पूर्वपदावर येत आहे. नागपुरात बाजारपेठही सुरु झाली आहे. वर्दळ सामान्य होऊ लागली आहे.
या ठिकाणची संचारबंदी उठवली असली तरी पोलीस प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष आहे. नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे 250 कोटींचा व्यापार प्रभावित झाला होता.
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणानंतर नागपुरातील परिमंडळ 3 , 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील लकडगंज पाचपवली, शांतीनगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशनहद्दीचा समावेश होता. आता ही सर्व संचारबंदी उठवण्यात आली आहे. यातील अनेक भागांची संचारबंदी यापूर्वीच टप्प्या टप्प्याने उठवण्यात आली होती.
दरम्यान, या हिंसाचारात एक जणाचा मृत्यू झाला होता. तसेच 20 दुचाकी, 40 चारचाकीचे आणि 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आली होती. त्यात काही अल्पवयीन मुली आहेत.





