5G Internet Slow Problem: देशातील एअरटेल आणि जिओ सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी बहुतांश शहरांमध्ये आपली ५जी सेवा विस्तारली आहे. अनेक युजर्सच्या मोबाईल स्क्रीनवर ५जी नेटवर्कचे पूर्ण बार आणि सिग्नल दिसत असूनही प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग अत्यंत संथ असतो किंवा डेटा चालतच नाही. जर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये ५जी असून इंटरनेट नीट चालत नसेल, तर काही साध्या सेटिंग्ज बदलून तुम्ही ही समस्या घरबसल्या सोडवू शकता. व्हीपीएन बंद करा – इंटरनेटचा वेग कमी होण्यामागे अनेकदा मोबाईलमधील ‘व्हीपीएन’ (VPN) सक्रिय असणे हे प्रमुख कारण असते. जर तुमच्या फोनमध्ये एखादे व्हीपीएन ॲप सुरू असेल, तर डेटा रूट बदलल्यामुळे ५जी कनेक्शनची गती मंदावते. त्यामुळे इंटरनेट वापरताना आधी व्हीपीएन बंद करून तपासावे. याशिवाय, नेटवर्कमध्ये तांत्रिक अडथळा असल्यास फोन ‘एअरप्लेन मोड’वर टाकून १० सेकंदांनंतर पुन्हा सामान्य स्थितीत आणल्यास नेटवर्क रिफ्रेश होते आणि इंटरनेटचा वेग सुधारण्यास मदत होते. ‘नेटवर्क मोड’ची सेटिंग बदला – मोबाईलमधील ‘नेटवर्क मोड’ची सेटिंग योग्य असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘प्रेफर्ड नेटवर्क टाईप’ (Preferred Network Type) मध्ये नेहमी ५जी/४जी/३जी (ऑटो) हा पर्याय निवडावा. यामुळे फोन उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सिग्नलला आपोआप कनेक्ट होतो. तसेच ५जी तंत्रज्ञान अद्याप प्रगत होत असल्याने कंपन्या सतत नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स देत असतात. जुन्या सॉफ्टवेअरमुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळे येऊ शकतात, त्यामुळे आपला स्मार्टफोन नेहमी अपडेटेड ठेवावा. सिम कार्ड बदलून घ्या – जर वरील सर्व उपाय करूनही इंटरनेटचा वेग वाढत नसेल, तर ही समस्या सिम कार्डशी संबंधित असू शकते. जुन्या किंवा खराब झालेल्या सिम कार्डमुळे नेटवर्क स्थिरता राहत नाही. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सिम कार्ड बदलून घेणे हा उत्तम पर्याय ठरतो. ५जी सिग्नल दिसणे म्हणजे कायम वेगवान इंटरनेट मिळेलच असे नाही, कारण नेटवर्कची घनता आणि सॉफ्टवेअरची सुसंगतता यावरही डेटाची गती अवलंबून असते.