कांदा मार्केटला कांदा ५५२१ रुपये

घोडेगाव : केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलरचे निर्यातमूल्य हटवले आहे, तसेच कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क कमी करून २० टक्के केल्याचा परिणाम घोडेगाव येथील कांदा बाजारात झाला. शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी कांद्याच्या दराने मोठी उसळी घेतली. ४० ते ४५ रुपयांपर्यंत असणारा कांदा बाजार ५० ते ५५ रुपये क्विंटल वर जाऊन पोहोचला. सर्वाधिक कांदा दर मिळालेल्या शेतकऱ्यांचा आडतदारांकडून फेटा बांधून सन्मान करण्यात आला. कांदा मार्केटमध्ये ५० रुपयांचा टप्पा गाठल्यावर शेतकऱ्यांनी व आडतदारांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
घोडेगाव कांदा मार्केटमध्ये २७,४२४ कांदा गोणी आवक झाली होती. सकाळी ११ वाजता लिलावास सुरुवात होताच बाजार दराने पाच हजार रुपयांचा टप्पा पार केला, बाळासाहेब शंकर सुकाळकर, उस्थळ दुमाला व दत्तात्रेय फाटके, हिंगोणी या शेतकऱ्यांच्या सर्वोत्तम कांद्यास प्रतिक्विंटल ५५२१ व ५५३१ रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला. यानंतर कांदा आडतदार श्रीकांत येळवंडे यांनी महाराष्ट्र ट्रेंडीग दुकानात शेतकऱ्यांना फेटा बांधून सन्मान केला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नंबर एक कांद्यास ४८०० ते ५५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मोठा कांदा ४८०० ते ४९००, मीडियम ४७०० ते ४८००, गोल्टी कांदा ३८०० ते ४१००, गोल्टा कांदा ४३०० ते ४६००, जोड कांदा १५०० ते २५००, बदला माल २७०० ते ३०००, कलर कमी कांदा ३२०० ते ३८०० रुपये इतका दर मिळाला.
केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलरचे निर्यातशुल्क हटवल्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. उशिरा का होईना सरकारला हे शहाणपण सुचले ही दिलासादायक बाब आहे. आज ५५२१ रुपये हा सर्वाधिक दर शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या आडतीवर करत असतो. यापुढे देखील शेतकऱ्यांनी कांद्याची वर्गवारी करून टप्याटप्याने कांदा विक्रीस आणून सरासरी चांगला बाजारभाव मिळू शकतो.
श्रीकांत येळवंडे , महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी





