Nagar News | श्रीगोंदा तालुक्यात ५५.४९ टक्के मतदान

श्रीगोंदा, : विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा मतदारसंघात संध्याकाळीपर्यंत पाच वाजेपर्यंत ५५.४९ टक्के मतदान होऊन १ लाख ८८ हजार ३९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर श्रीगोंदा शहरासह नगर, श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
मागील १५ दिवसांपासून प्रचाराच्या सुरू असलेल्या रणधुमाळीने चुरशीचे वातावरण राहिले होते. आज १६ उमेदवारांचे भविष्य मतपेटीमध्ये बंद झाले असून, यात आ.बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत होती.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ३९ हजार ५२६ मतदार असून, यामध्ये १ लाख ७६ हजार ३६५ पुरुष तर १ लाख ६३ हजार १५९ महिला मतदार आहेत.
यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ८८ हजार ३९४ मतदारांपैकी ९७ हजार ९९९ पुरुष तर ९० हजार ३९५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.४९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली. मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत तालुक्यात २० टक्याच्या आत मतदान झाले होते. दुपारी तीन नंतर मतदानाचा जोर वाढून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
पाच वाजेपर्यंत ५५.४८ टक्के मतदान होऊन श्रीगोंदा शहरासह नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. बुधवारी (दि.२०) झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदानाला दुपारनंतर उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने मतदान करतानाचे चित्र दिसून आले. दिवसभरात किरकोळ अनुचित प्रकार घडता मतदान रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली.





