सवलत योजनेचा 54 हजार 680 करदात्यांनी घेतला फायदा

पिंपरी – महापालिका करसंकलन विभागाच्या मिळकत कर सवलत योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत एकूण 54 हजार 680 जणांनी घेतला आहे. त्यामध्ये एकूण 5 कोटी 40 लाख 43 हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. संबंधित रकमेत 4 हजार 984 जणांना अभय योजनेत दिलेल्या 97 लाख रुपयांच्या सवलतीचा देखील समावेश आहे.
करसंकलन विभागाकडून चालू वर्षाचा मिळकतकर आणि थकबाकी रक्कम एकरकमी वसूल व्हावी, या उद्देशाने सुरवातीला मे अखेरपर्यंत सवलत योजना लागू होती. या योजनेची मुदत सध्या जून अखेरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. चालू आर्थिक आत्तापर्यंत 54 हजार 680 जणांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांनी एकूण 54 कोटी 64 लाख रुपयांचा मिळकतकर भरला. त्यावर त्यांना 5 कोटी 40 लाख 43 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.
सवलत योजनेचा लाभ महिला, दिव्यांग, शौर्यपदकधारक सैनिक, माजी सैनिक, ऑनलाइन भरणा करणारे, वार्षिक एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना दिला जातो. अवैध बांधकाम शास्ती वगळुन मूळ मिळकतकराची रक्कम नागरिकांनी जमा करावी, या उद्देशाने लागू केलेल्या अभय योजनेचा देखील 4 हजार 984 जणांनी लाभ घेतला आहे. त्यांना मनपा शास्तीमध्ये (विलंब दंड) 90 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांना एकूण 97 लाख 77 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. त्याशिवाय, एकरकमी थकबाकीची रक्कम भरणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात आहे.
38 कोटींचा मिळकतकर ऑनलाइन जमा
41 हजार 168 मिळकतधारकांनी 38 कोटी 45 लाख रुपयांचा मिळकतकर ऑनलाइन जमा केला. त्यावर त्यांना 3 कोटी 43 लाख 95 हजार रुपयांची सवलत मिळाली. मिळकत कर सवलत योजनेचा 148 दिव्यांगांनी फायदा घेतला. त्यांनी 8 लाख 81 हजाराचा मिळकतकर जमा केला. त्यांना 3 लाख 78 हजार रुपयांची सवलत मिळाली. 1 हजार 786 महिलांनी 1 कोटी 8 लाख 42 हजार रुपयांचा मिळकतकर भरला. त्यांना 45 लाख 76 हजार रुपयांची सवलत मिळाली. 4 शौर्यपदकधारक जवानांनी 19 हजाराचा मिळकतकर जमा केला. त्यांना 61 हजाराची सवलत मिळाली. 486 माजी सैनिकांना 11 लाख रुपयांची सवलत मिळाली. तर, त्यांनी 27 लाख 35 हजार रुपयांचा कर जमा केला.
अकरा दिवसांत 20 कोटी जमा
जून महिन्यात अवघ्या 11 दिवसांमध्ये 20 कोटी 23 लाख रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नागरिकांनी मिळकतकर सवलत योजना आणि अभय योजनेचा फायदा घेऊन मिळकतकराची रक्कम आणि थकबाकी जमा करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे-मारणे यांनी केले आहे.





