नेवासा तालुक्यातील 26 पुनर्वसित गावांसाठी 53 कोटींचा निधी; आमदार लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

नेवासा – नेवासा तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित आणि पुनर्वसित २६ गावांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी ५३ कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी दिली. या गावांमध्ये रस्ते, स्मशानभूमी, पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधांची कामे पूर्ण होणार आहेत.
आमदार लंघे-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडली होती. सुरुवातीला ५० वर्षांपूर्वीच्या पुनर्वसित गावांना या आराखड्यातून वगळण्याचा निर्णय होता. मात्र, लंघे यांनी वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन १९७६ पूर्वीच्या गावांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यानुसार, हा आराखडा दुरुस्त करून २६ गावांचा समावेश करण्यात आला. यामुळे बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरा संगम, खलाल पिंपरी, बकूपिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ दुमला, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, रामडोह, सुरेगाव गंगा, जैनपूर, सुरेगाव दही, खामगाव, वरखेड, उस्थळ खालसा, बेलपांढरी, बोरगाव, बोधेगाव या गावांना लाभ होणार आहे.
आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे आभार मानले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या गावांमधील अपूर्ण सुविधा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





