भाजपसाठी धोक्याची घंटा; 52 टक्के जनतेची पुन्हा ममतांनाच पसंती

कोलकाता,- प. बंगाल विधानसभा निवडणुकीच रण पुन्हा तापले आहे. राज्याची धुरा आपल्याच हाती ठेवण्यात आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारण्यास ममता बॅनर्जी सज्ज झाल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पार्टीच्या गोटात उत्साह संचारला आहे. आता बंगाल काबिज करायचेच याकरता भाजप तयारीला लागला आहे. मात्र यादरम्यान जो सर्वे झाला आहे तो ममता बॅनर्जी यांचा उत्साह वाढवणारा आहे.
राज्यातील 52 टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा ममताच हव्या असल्याचे त्यातून निष्पन्न झाले आहे. गेल्या काही काळात ममतांच्या तृणमूलला गळती लागली आहे. 18 आमदार, एक मंत्री आणि एक खासदार यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. असे असताना ममता गड राखणार का, असा सवाल केला जात असतानाच आता जनमत अजुनही त्यांना अनुकुल असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (25 टक्के) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (4 टक्के) यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शवण्यात आली आहे. सर्वेक्षणात 7527 नागरिकांची मते जाणून घेण्यात आली व त्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.





