52 आमदारांना सोडलं, पण ते पवारांना सोडायला तयार नाहीत : गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईः गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सामील झाल्यानंतर आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. ” त्यांनी वर्षा सोडलं, आपल्या 52 आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्हीसुद्धा त्यांच्याकरिता भरपूर केलेलं आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत” , असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी गुवाहाटीतील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये इतर आमदारांना संबोधित केलंय, त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
वेळ येईल तेव्हा मी त्यांना चुना लावेन..
आजचा प्रसंग, कालचा प्रसंग आणि परवाचा प्रसंग, आता आपण कसे कसे आलेले आहोत. ते मला सांगण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांवर मजबूत पद्धतीनं जिल्ह्यात आणि आपापल्या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ते होत असतानाही बऱ्याच पद्धतीनं आपल्या पाठीमागे लोक उभे राहत आहेत. आपण शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहोत. आपल्यावर भरपूर टीका झाली आहे. कधी प्रेत काढून घेऊ, तुमचे बाप किती, आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहीत नाही. 100 टक्के आपण वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानं या पदापर्यंत पोहोचलो आहोत. असेही गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.
हे लोक फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झाले…
पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं की , 1992 दंगली वेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते मला माहीत नाही. 302 काय असते हे संजय राऊतांना माहीत नाही, आम्ही सगळ्यांनी ते भोगलेलं आहे. तडीपार काय असतं हे त्यांना माहीत नाही, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असतं हे त्यांना माहीत नाही. हे लोक फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांचे विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. 80 टक्के जरी संघटनेचा असला तरी 20 टक्के स्वतःच्या सहभाग आहे.
संजय राऊतांनी 47 डिग्री सेल्सियसमध्ये जळगावात येऊन 35 लग्न लावून दाखवावीत मी त्यांना 72 म्हणून समजून घेईन. ज्यावेळी रात्री 12 वाजताही रक्ताची गरज असते तेव्हा आमचा मोबाईल सुरू असतो. आपण 39 आणि अपक्ष 11 ते 12 मंडळी सभागृहात आणि डिबेटमध्ये काफी आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
गुलाबराव पाटील यांचा वरील मुद्द्यावरील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.





