VIDEO : प्रचारात 500 च्या नोटा उडवणं पडलं महागात.. काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांविरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली – कर्नाटकात विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपसह काँग्रेसने देखील आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. मंड्यातील स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार मंड्या ग्रामीण पोलिसांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमार यांनी रोड शोमध्ये लोकांवर नोटांचा वर्षाव केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
28 मार्च रोजी आयोजित ‘प्रजा ध्वनी यात्रे’ दरम्यान, शिवकुमार मंड्या जिल्ह्यात एका रॅली दरम्यान 500 रुपयांच्या नोटा फेकताना दिसले होते.यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस नेते डीके शिवकुमार कर्नाटकातील बेविनाहल्लीजवळ एका रोड शोमध्ये पैसे उडवताना दिसले. काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने याला कडाडून विरोध केला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी आरोप केला की डीके शिवकुमार निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. आणि आपल्या धन शक्तीचा खुलेआम वापर करत आहेत. राज्यातील जनता भिकारी आहे असा काँग्रेसचा विचार आहे, पण जनता सर्व काही जाणते आणि त्यांना धडा शिकवायला तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
#WATCH | Karnataka Congress Chief DK Shivakumar was seen throwing Rs 500 currency notes on the artists near Bevinahalli in Mandya district during the ‘Praja Dhwani Yatra’ organized by Congress in Srirangapatna. (28.03) pic.twitter.com/aF2Lf0pksi
— ANI (@ANI) March 29, 2023
पोलिसांनी काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार यांच्या बाजूने सफाई दिली. ते म्हणाले शिवकुमार हे पक्षाच्या प्रचारादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांना पैसे देत होते. आता कर्नाटकातील राजकीय वातवरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. या घटनेचा आता निवडणुकांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





