चक्काजाम आंदोलन! दिल्लीला ‘छावणी’ स्वरूप; 50 हजार जवान तैनात

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राजधानीत दिल्ली पोलिस, निम लष्करी दले आणि राखीव दलांचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले. तर किमान 12 मेट्रो स्टेशन्सना सतर्क ठेवण्यात आले.
दरम्यान, अतिरिक्त फौजफाटा दिल्लीत शनिवारी तैनात करण्यात आला होता. अनेक स्तरीय बॅरिकेड, काटेरी वायरच्या कुंपणाने रस्ते अडवण्यात आले होते. त्यामुळे शहराला जणू छावणीचेच स्वरूपच आले होते.
लाला किल्ल्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिंटो ब्रिजजवळ बॅरिकेड्स लावून हा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आयटीओ भअगात काटेरी तारांचे कुंपण लावण्यात आले होते.
आम्ही सरकारला हे कायदे मागे घेण्यासाठी दोन ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही आमची धोरणे ठरवू. आम्ही सरकारबरोबर कोणत्याही दबावाखाली चर्चा करणार नाही, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले.
पालवाल आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला होता. त्यावेळी आलेल्या एका ऍम्ब्युलन्सला निदर्शकांनी रस्ता काढून दिला.
शेतकरी 71 दिवसांपासून रस्त्यावर आहेत. एका बाजूला सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगत आहे. तर दसऱ्या बाजूला ते शेतकऱ्यांचे वीज, पाणी तोडत आहेत. ते शेतकऱ्यांना त्रास देत आहेत.





