हाकाऱ्या माळावर संत केदारी महाराज यात्रेनिमित्त 50 जणांचे रक्तदान

वैजवाडी (ता. परळी) – आपल्या देशात प्रगतीच्या अनेक वाटा निर्माण झाल्या; पण मानवी रक्तासाठी कोणताही पर्याय आजपर्यंत मिळाला नाही. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तथा कारखान्यात तयार होत नसते, ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात….! आपण रक्तदान केले नाहीतर आपल्या रुग्णांना रक्त कोठून मिळणार ? रुग्णांना जीवदान कसे मिळणार ? रस्त्यावरील अपघातात अतिरक्तस्राव झालेला व्यक्ती, प्रसूती वेळी अथवा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झालेल्या महिलेला वेळीच रक्त मिळाले तरच त्यांचे प्राण वाचतात. तसंच शस्त्रक्रियासह आदी रुग्णांना रक्ताची गरज असते. त्यामुळे “रक्तदान जीवनदान” या भावनेतून श्री संत केदारी महाराज साधना मंदिर हाकाऱ्या माळ (वैजवाडी, ता. परळी, जिल्हा बीड ) येथे गुरुवारी (11 जानेवारी ) यात्रेनिमित्त आलेल्या 50 जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून राष्ट्रीय सेवा बजावली.
वैद्यनाथ ब्लड बँक आणि लातूर ब्लड सेंटर यांनी केदारेश्वर मित्र मंडळ वैजवाडीकर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लॅब टेक्निशियन गोपीनाथ सांगळे, महेश चोले, पायल वंजारी, ज्ञानेश्वर शिंदे, प्रणिता कदम, बिलकीश शेख यांसह सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले.
रक्तदानाचे फायदे –
रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते, हा गैरसमज आहे. प्रौढ शरीरात सरासरी 5 लिटर रक्त असतं. रक्तदान केल्यानंतर 24 ते 48 तासांत पुन्हा तेव्हढे रक्त शरीरात तयार होतं. रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं, असंही अनेकांना वाटतं. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीनं होते. रक्तदानामुळे झालेली रक्ताची हानी शरीर काही दिवसात भरुन काढतं. एकदा रक्तदान केल्यावर 3 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा रक्तदान करू शकता.
रक्तदानाचा उद्देश गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं याबरोबरच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
*रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
*रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
*नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.
*याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.




