‘ऑक्सिजन’च्या मागणीत 50 टक्के वाढ

रुग्णालयात जागा नसल्याने घरीच केले जातात उपचार
पिंपरी – करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णालयात जागा नसल्याने लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरही घरीच उपचार केले जात आहेत. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास ही करोनाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत रुग्णालयात उपचाराकरिता दाखल व्हावे, असे आवाहन सरकारच्यावतीने वारंवार जाहिरातीद्वारे केले जात आहे. मात्र शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. यामुळे महापालिकेने महाविद्यालये, वसतीगृह तसेच क्रीडा संकुलातील इमारती ताब्यात घेऊन रुग्णांवर उपचार करण्यास सुरवात केली आहे. तरीदेखील वाढत्या रुग्णांवर उपचारासाठी आता जागाच शिल्लक नाही. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार केले जातात. मात्र आता रुग्णसंख्या एवढी वाढली आहे की लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरही घरीच उपचार घेण्याची वेळ आली आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांसाठी खासगी वितरकांद्वारे ऑक्सिजनचा सिलेंडर पुरविण्यात येत आहे. त्यासाठी बाजारात दोन हजारांपासून ते आठ हजार रुपये अनामत रक्कम घेतली जात आहे. तसेच हा सिलेंडर रिफिल करण्यासाठी 170 रुपयांपासून ते 1,200 रुपयांपर्यत आकारले जात आहेत.
एक छोटा सिलेंडर साधारणतः दोन ते अडीच तास तर मोठा 46 लिटरचा सिलेंडर दोन ते तीन दिवस चालतो. म्हणजेच एका दिवसाला 9 ते 10 छोटे सिलेंडर लागतात. दिवसाला साधारतः एक हजार 700 रुपये लागतात. खासगी रुग्णालयात एका रुग्णांसाठी पाच ते सहा हजार रुपये आकारले जातात. त्यातही रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची दमछाक होते. अशावेळी घरीच उपचार हा मार्ग आता नातेवाईक निवडताना दिसतात.





