पुणे | पीएम-पोषण योजनेसाठी ५० कोटींचा निधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम- पोषण) योजनेतंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळीचा लाभ देण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच, शासन अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये देखील १० आठवड्यांकरीता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी अथवा अन्य फळ उपलब्ध करुन देण्यासाठी निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे.
या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमितपणे एमडीएम पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.
नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत अंडी किंवा केळी यांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकामार्फत घेण्यात यावे लागेल. प्रमाणपत्राशिवाय संबंधित संस्थांची अंडी किंवा केळीबाबतची बिले देण्यात येणार नाहीत, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





