सुरक्षा परिषदेत ‘या’ 5 नवीन देशांचा समावेश

न्यूयॉर्क – डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया यांनी काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू केला. या पाच देशांनी इक्वेडोर, जपान, माल्टा, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडची जागा घेतली. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात या निमित्ताने ध्वज प्रतिष्ठापन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पाच नवीन सदस्यांच्या अस्थायी प्रतिनिधींनी सुरक्षा परिषदेच्या कक्षाबाहेर आपापले राष्ट्रध्वज लावण्यापूर्वी छोटी भाषणे केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या १५ सदस्य आहेत. त्यापैकी पाच स्थायी सदस्य आहेत आणि १० निर्वाचित सदस्य असतात. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स हे सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य आहेत. या देशांनाच नकाराधिकाराचा अधिकार प्राप्त आहे. एकत्रितपणे, या गटाला पी ५ असे म्हणतात.





