Shiv Sena Operation Tiger : राजकीय भूकंपाची चाहूल…! ठाकरे गटाचे ५ खासदार शिंदेंच्या संपर्कात; ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा अॅक्शनमध्ये

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत फाटाफूट पुन्हा एकदा उफाळून आली आहे. ठाकरे गटातील पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, आगामी पावसाळी अधिवेशनात याचा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटात सामील होण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रीय झाले असून, या मोहिमेच्या यशासाठी शिंदे गटाला अजून एका खासदाराची गरज आहे. पक्षांतरबंदी कायद्यातून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी फुटीचा ‘मुहूर्त’ही जाहीर केल्याने या घडामोडींना अधिकच बळ मिळाले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची सुरुवात कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून झाली असून, ठाकरे गटातील अनेक माजी आमदार आणि सध्या सक्रिय असलेले नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमधील काही नेत्यांनीही हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे शिंदे गटासाठी ही मोहीम पुढे नेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी अजित पवार गट व भाजपकडे कोणते खासदार वळणार, याचा अंदाजही मांडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ही राजकीय उलथापालथ ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते. आता उद्धव ठाकरे हे या संभाव्य गळतीला कसे थोपवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘ऑपरेशन टायगर’ आहे तरी काय?
- ठाकरे गटातील नेत्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले आहे.
- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली.
- ठाकरेंचे माजी आमदार आणि नेत्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश
- पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून बचावासाठी शिंदेंना एका खासदाराची गरज
- पावसाळी अधिवेशनाआधी ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण करण्याचा निर्धार





