पुणे | शेअर मार्केटच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी ५ लाख ४३ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथील ६४ वर्षीय जेष्ठ व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर ठगांनी फिर्यादींशी संपर्क साधला.
त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख ४५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. फिर्यादींना विश्वास वाटावा म्हणून दोन लाख दोन हजार रुपये परत दिले. मात्र, त्यानंतर त्यांची पाच लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुंबई नार्कोटिक्सचा फंडा अन ३२ लाखांचा गंडा
तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तुमच्याविरुद्ध मुंबई नार्कोटिक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत आहे, अशी भीती दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला ३१ लाख ८९ हजारांचा सायबर चोरांनी आर्थिक गंडा घातला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १० ते १७ एप्रिल या कालावधीत ही घटना घडली आहे.
सायबर चोरट्यांनी फिर्यादींशी मोबाईलद्वारे संपर्क केला. मुंबई ते बँकॉक- थायलंड असे तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. नार्कोटिक्स विभाग मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येणार आहे, अशी भीती दाखवली. फिर्यादी घाबरले त्यामुळे त्यांनी सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे माहिती देत राहिले. पुढे चौकशी करण्याच्या बहाण्याने सर्व्हिलन्स खाते पाठवायचे असल्याचे भासवून त्यांच्याकडून ३१ लाख ८९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
टास्क फ्रॉडद्वारे तरुणीची चार लाखांची फसवणूक
कोंढवा रोड कात्रज येथील एका तरुणीला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून टास्क फ्रॉडद्वारे ३ लाख ९९ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी टेलिग्रामद्वारे तरुणीशी संपर्क साधला. तिला टास्कद्वारे जादा पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पेड टास्क देऊन तिच्याकडून ४ लाख १२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतले. विश्वास वाटावा म्हणून १२ हजार ३५० रुपये तिच्या खात्यावर परत दिले. मात्र, त्यानंतर ३ लाख ९९ हजार ६५० रुपये परत न देता तिची फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसाचा बनाव करून कामगारांना लुबाडले
२९ हजार ९०० रुपयांची फसवणूक
पोलिस असल्याची बतावणी करत कामगारांना लुबाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. फोन पेद्वारे आरोपींनी कामगारांकडून २९ हजार ९०० रुपये ट्रान्स्फर करून घेतले आहेत.
याबाबत कृष्णगोपाल जगदीशप्रसाद साकेत (२६, रा. सकाळनगर लेबर कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एनसीएल पोस्ट ऑफिससमोर पाषाण रोड येथे घडली आहे.
फिर्यादी आणि त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी मिळून रिक्षाने मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी निघाले होते. त्या वेळी पाषाण रोड येथील पोस्ट ऑफिसमोर मोपेड दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना थांबविले.
त्यानंतर पोलिस असल्याची बतावणी करत चौकशी आणि तपासणी करायची असल्याचे सांगितले. फिर्यादींच्या मोबाइलमधून आरोपींनी ऑनलाइन पैसे घेतले, तर फिर्यादीच्या अन्य एका साथीदाराकडून रोकड घेतली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.





