पुणे | सलग चौथ्या दिवशी उच्चांकी उष्णता

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सलग चौथ्या दिवशी शहरातील हडपसर येथे उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सूर्य तळपल्याने हडपसरसह कोरेगाव पार्क आणि वडगावशेरी येथे सर्वाधिक ४३ अंशाच्या पुढे उष्णतेचा पारा गेला, त्यामुळे अंगाची लाहिलाही आणि उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत.
राज्यात मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, सोलापूर, जळगाव पाठोपाठ पुणे शहरातील उष्णतेचा पारा उच्चांकी आहे. वाढत्या तापमानामुळे पुण्यात विदर्भाच्या तापमानाचा अनुभव येत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ४३ अंशावर गेलेला पारा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खाली आला. त्यात अवकाळी पावसामुळे कमाल तापमान ४० अंशापर्यंत खाली गेले होते. मात्र, मागील चार दिवसांपासून वडगावशेरी, हडपसर, मगरपट्टा, कोरेगांव पार्क आणि शिरूर भागात दररोज उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तापमानही ४१ अंशाच्या पुढे गेले आहे.
प्रमुख भागातील कमाल तापमान
शहरात अनेक वर्षानंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. हडपसर – ४३.५, वडगांवशेरी – ४३.१, कोरेगांव पार्क ४३, शिरूर ४२.८, राजगुरूनगर – ४२.७, मगरपट्टा – ४२.४, चिंचवड – ४२, तळेगाव – ४१.३, शिवाजीनगर आणि पाषाण – ४१, एनडीए – ४०.९, बालेवाडी – ४०.७, इंदापूर – ४०.५, बारामती – ३९.३, हवेली – ३९.२




