इजिप्तजवळ बोट बुडून ४९ जणांना जलसमाधी; आणखी १४० झाले बेपत्ता

कैरो – येमेनच्या किनाऱ्यावर स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट बुडाली, त्यात किमान ४९ लोकांना जलमाधी मिळाली आहे. आणखी १४० बेपत्ता झाले, असे संयुक्त राष्ट्र संघाने मंगळवारी सांगितले.
ही बोट सोमालियाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरून सुमारे २६० सोमाली आणि इथिओपियन लोकांना घेऊन ३२० किलोमीटरच्या प्रवासावर एडनच्या आखातावर जात होती, तेव्हा येमेनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर सोमवारी ती बुडाली, असे आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
या बोटीतील ७१ जणांची सुटका करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे, मृतांमध्ये ३१ महिला आणि सहा मुलांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पूर्व आफ्रिका आणि हॉर्न ऑफ आफ्रिकेतील स्थलांतरितांसाठी येमेन हा प्रमुख मार्ग आहे या मार्गाने शरणार्थी कामासाठी आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.
येमेनमध्ये जवळपास दशकभर चाललेले गृहयुद्ध असूनही, अलिकडच्या वर्षांत येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या तिप्पट झाली आहे, २०२१ मध्ये सुमारे २७ हजारावरून गेल्या वर्षी ९० हजारापेक्षा जास्त शरणार्थ्यांनी तेथे प्रवेश केला, असे आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे. सुमारे ३ लाख ८० हजार स्थलांतरित सध्या येमेनमध्ये आहेत.





