47 वर्षांपूर्वी प्रभात : ता. 26, माहे जून, सन 1977

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती लवकरच स्थापन
नवी दिल्ली, दि. 25 – देशात लवकरच राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीची स्थापना करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत ही समिती सरकारला सल्ला देईल. नागरी पुरवठा सहकार मंत्रालयाच्या 1976-77च्या अहवालात हे जाहीर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, समान पुरवठा होण्यासाठी जनसामान्यांच्या गरजेच्या वस्तू योग्य दरात उपलब्ध करून व व्यापारातील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी ही समिती काम करेल. समितीची रचना, कक्षा व कार्यपद्धती काय असावी यावर विचार चालू आहे.
वाणिज्य विभागाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड लोंढा
पुणे – वाणिज्य विभागाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्या प्रवेशाची समस्या सर्व वाणिज्य महाविद्यालयांसमोर उभी आहे. 12वी पास होऊन एफवाय वाणिज्य विभागाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा महाविद्यालयात वाढला आहे. या प्रश्नाचा विचार करण्यासाठी कुलगुरू दाभोळकरांच्या अध्यक्षतेखाली सर्व वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक झाली. सर्व महाविद्यालयातून समान वर्गवारीने प्रवेश देण्याचा निर्णय झाला.





