“महाराष्ट्रातील 45 खासदार गप्प, पण तुम्ही हिंमत दाखवली”; काँग्रेस खासदाराचं राज ठाकरेंकडून कौतुक

Raj Thackeray | पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला मनसेचा कडाडून विरोध होता. मनसेसह राज्यभरातील मराठी प्रेमींचा वाढता विरोध पाहता सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागला. मराठी- हिंदीच्या या वादादरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आपटून आपटून मारू, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील दुबे यांना आव्हान दिले होते.
दुबे यांच्या वक्तव्याप्रकरणी लोकसभेत काँग्रेसच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना घेराव घालत थेट जाब विचारला. याचे राज ठाकरे यांनी कौतूक केलं आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून कौतूकाची थाप दिली आहे.
मराठी भाषेचा अपमान होताना संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प
राज ठाकरेंनी खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनंदनपर पत्र लिहिलं आहे. ‘मराठी माणसांना आपटून आपटून मारु, अशी दर्पोक्ति करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि जाब विचारलात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान होत असताना संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही कृतीनं छेद दिलात. याबद्दल तुमचे मनापासून आभार,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी गायकवाड यांचं कौतुक केलं आहे.
‘महाराष्ट्राला सध्या व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्रानं देशाचा विचार केला पाहिजे हे खरं आहे. कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्यं आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे, याचा विसर पडायला लागला आहे,’ अशी खंतही राज यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
‘सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या आणि १९५७ चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणे असू देत. यात मरहट्टे होते. याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठीची माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे. तुम्ही ती ताकद दाखवलीत याबद्दल मनापासून आभार,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी खासदार गायकवाड यांचं कौतुक केलं आहे. Raj Thackeray |
तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल कौतुक
‘महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसले माहीत नाही. पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यासमोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत,’ असंही राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे. Raj Thackeray |
हेही वाचा :





