पुणे जिल्हा | शिरूर तालुक्यातील 442 शस्त्रे जमा करण्याचे आदेश

शिक्रापूर, (वार्ताहर) – विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र जवळील पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले असताना शिरुर तालुक्यातील 442 शस्त्रे जमा करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
विधानसभा मतदार संघात निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये तसेच सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांकडून आदेश निर्गमित करण्यात आले असताना पुणे जिल्ह्यातील 33 पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल 3 हजार 677 शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
यामध्ये शिरुर तालुल्यातील देखील 442 शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिलेले असून यामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 119, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील 273 तर रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन हद्दीतील 50 शस्त्रपरवाना धारकांना त्यांच्या जवळील शस्त्रे पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याचे आदेश दिलेत.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता मधील कलम 223 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.





