शिरूरमधून ४४ मजूर आपल्या मूळगावी परतणार – तहसीलदार लैला शेख

शिरूर(प्रतिनिधी) : शिरूर येथे लेबर कॅम्पमध्ये वाशिम जिल्हयामधील असलेल्या ४४ नागरिकांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली आहे .
कोरोनाच्या संकटामुळे पुणे मुंबई येथे काम करणाऱ्या मजूरांनी वाहने मिळत नसल्याने पायीच घराकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र जिल्हाबंदीचे आदेश असल्यामुळे शिरूर तालुक्यांच्या हद्दी मधे सुमारे दोनशे मजुरांना अडवून लेबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. शिरूर, कारेगाव, शिक्रापुर, कोरेगाव भिमा येथे लेबर कॅम्प केलेले आहे .
शिक्रापूर दरम्यान सुमारे ४४ मजुरांना पोलिसांनी रोखून त्यांना लेबर कॅम्प मधे ठेवण्यात आले होते . त्यांची प्रशासनाने जेवण व राहण्याची चांगली व्यवस्था केली. सरकारने या अडकलेल्या नागरिकांना घराकडे परतण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर तहसीलदार लैला शेख यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडून यासंबंधी परवानगी प्राप्त करून घेतली.
वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा हिरवा कंदील दिल्यानंतर मजुरांची वैद्यकीय तपासणी करून बस मधुन त्यांना आपल्या मुळ गावी पोहचविण्यात येणार आहे. अद्यापही इतर जिल्हयामधील मजुरांना घराकडे जाण्यासाठी परवानगी मागितली असुन ती मिळताच सर्वाना मुळ गावी सोडण्यात येईल असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. एक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मजुर गावाकडे पोहचणार असल्यांची खबर त्यांना मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता .
शिरूरवरुन परराज्य व जिल्हयात पोहण्यासाठी स्वतंत्र लिंक तयार करण्यात येत असुन त्यामधे सर्व माहिती भरावी. तसेच फोटो, आधार क्रमांक महत्वाचा आहे. अर्जाची छाननी करण्यात येईल. माहिती योग्य भरली असेल तर मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर वैदयकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ते पाहून परगावी जाण्यास अंतिम मंजुरी मिळेल असे शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले .





