पुणे | व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेअर ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमावण्याच्या नादात एका हॉटेल व्यावसायिकाने तब्बल ४३ लाख रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कॅम्प परिसरातील ५२ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली असून, हा प्रकार १८ फेब्रुवारी ते १४ मे या कालावधीत घडला आहे.
सायबर चोरट्याने व्हॉट्सअपवरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. फिर्यादी यांनी आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला.
त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअप जॉइन करायला सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादींनी अॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
यानंतर त्यांना ५ लाख रुपये मोबदला देण्यात आला. फायदा होत आहे, असा विश्वास बसल्याने त्यांनी पैशांची गुंतवणूक सुरू ठेवली. काही काळानंतर मात्र त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला, तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.




