पुणे | टास्क फ्रॉडमधून चौघांना ४३ लाखांचा गंडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ऑनलाइन टास्कच्या आमिषाने शहरात होणारे फसवणुकीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चाैघांची ४३ लाख ६९ हजार ९६६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी, चंदनगर, लोणीकंद आणि मुंढवा पोलीस ठाण्यांत माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फरीदा लैला अलेक्झांडर नावाच्या महिलेसह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठवून समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफीत, जाहिरातीस दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
सुरुवातीला चोरट्यांनी तक्रारदाराला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ९२ हजार ३८५ रुपये उकळले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने खराडी भागातील एका तरुणाची २० लाख सात हजार ४२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड तपास करत आहेत, तसेच वाघोली परिसरातील एका तरुणाची आठ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळे पेड टास्क देऊन तरुणाकडून सोयबर चोट्यांनी हे पैसे लुबाडले आहेत, तर घोरपडी मुंढवा येथील तरुणीची देखील अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. पार्टटाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून पेड टास्कच्या बहाण्याने तिच्याकडून सायबर चोरट्यांनी ३ लाख ६१ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.





