वीजमीटरमध्ये फेरफार करून 43 लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव इचलकरंजी येथील में. मतीन टेक्सटाईल्स या थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांने वीजमीटरमध्ये फेरफार करून 81 हजार 126 युनिटची वीजचोरी केली असून त्याची रक्कम 43 लाख 36 हजार 490 रूपये इतकी होते.
सदर वीजचोरी प्रकरणी मालक असिफ आयुब मोमीन यांचेविरूद्ध जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.
महावितरणच्या भरारी पथकाने 6 ऑक्टोबर रोजी यड्राव इचलकरंजी येथील मतीन टेक्सटाईल्स वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर व विद्युत संच मांडणीत वीजमीटर संथ गतीने फिरावे ,अशा हेतूने फेरफार केल्याचे निदर्शनास आले.
क्युचेकद्वारे तपासणी केली असता, हे वीजमीटर 32.50 टक्के इतक्या कमी गतीने वीजवापर नोंदवित असल्याचे स्पष्ट झाले. या वीजचोरीचा कालावधी 11 महिने इतका निर्धारीत केला असून या कालावधीत 81 हजार 126 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 43 लाख 36 हजार 490 रूपये व तडजोड रक्कम रूपये 10 लाख 50 हजार एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे.





