LPG Gas Cylinder Shortage – भिवंडी येथे बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचा संशय असलेले ४०५ एलपीजी सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये ९६ भरलेल्या सिलिंडरचा समावेश आहे. याप्रकरणी सोमवारी नारपोली पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (पुरवठा व वितरण नियमन) आदेश, २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे, रेशनिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता, त्यांना मोठ्या संख्येने एलपीजी सिलिंडर्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले आढळले, असे नारपोली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. Gas छापा टाकणाऱ्या पथकाने या सिलिंडरच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ट्रक आणि टेम्पो देखील जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या साहित्याचे एकूण मूल्य १८ लाख ७८ हजार रुपये इतके असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. देशातील ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण : आखाती प्रदेशातील युद्धजन्य वातावरणामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम एलपीजी (LPG) गॅसच्या उपलब्धतेवर होत असल्याची चर्चा आहे. घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलेंडरसाठी पूर्वी असलेला १५ दिवसांचा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. तसेच गॅस वितरक कंपन्यांना घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे वितरण नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिन्यातून मर्यादित सिलेंडर वितरणामुळे अनेक भागांत ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ऊर्जा पुरवठ्यावरील जागतिक दबाव, जहाजवाहतुकीतील अडथळे आणि आखाती प्रदेशातील अस्थिर परिस्थितीमुळे LPG, पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांच्या उपलब्धतेबाबत अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.