Middle East Crisis: अमेरिका-इराण युद्धाचा थेट परिणाम आता भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीवर दिसू लागला आहे. सुमारे ४ लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ बंदरांवर आणि समुद्रमार्गावर अडकला असून नवे निर्यात करार जवळपास पूर्णपणे थांबले आहेत. मालवाहतुकीचे दर दुप्पटीहून अधिक वाढल्याने निर्यातदारांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. नेमके काय झाले? ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (AIREA) अध्यक्ष सतीश गोयल यांनी सांगितले की, सुमारे २ लाख टन बासमती समुद्रमार्गावर अडकला असून तेवढाच माल भारतीय बंदरांवर पडून आहे. युद्धामुळे मध्यपूर्वेतील शिपिंग मार्ग विस्कळीत झाले असून वाढत्या कंटेनर भाड्यामुळे माल पाठवणे परवडेनासे झाले आहे. निर्यातदारांनी आधीच माल बंदरांपर्यंत पोहोचवला आहे, मात्र तो पुढे पाठवता येत नसल्याने साठवणुकीचा खर्चही वाढत आहे. AIREA ने वाणिज्य मंत्रालयाकडे तातडीने मदत मागितली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद, विमा रद्द – इस्रायलने लेबनानवर हल्ला केला असताना इराणने खाडी देशांच्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील टँकरांना लक्ष्य केले आहे. विमा कंपन्यांनी जहाजांचे कव्हरेज रद्द केल्याने मालवाहू जहाजे या जलमार्गातून जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे जागतिक शिपिंग दरांत मोठी वाढ झाली आहे. हेही वाचा – इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला! पिस्ता, केशर, खजूर महागले; पुढे आणखी संकट? पर्यायी बाजार नाही – भारत जगातील सर्वात मोठा बासमती तांदूळ निर्यातदार देश असून सौदी अरेबिया, इराण आणि यूएई हे प्रमुख खरेदीदार एकूण निर्यातीत निम्म्याहून अधिक वाटा उचलतात. या संकटाच्या काळात हा अतिरिक्त साठा सामावून घेण्यासाठी कोणताही पर्यायी बाजार सध्या उपलब्ध नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीतील एका व्यापारी कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, निर्यातदार सध्या मध्यपूर्वेतून नवे ऑर्डर स्वीकारत नसून आधीच्या करारांची पूर्तता करण्यावर भर देत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास काही निर्यातदार ‘फोर्स मेजर’ म्हणजेच अपरिहार्य परिस्थितीचा आधार घेऊन करारातून माघार घेण्याचा विचार करू शकतात, असेही या प्रतिनिधीने सांगितले. रेकॉर्ड पीक असूनही भाव घसरले – यंदा भारतात बासमतीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र निर्यात मागणीत अचानक आलेल्या घटीमुळे बासमतीचे भाव सुमारे ६ टक्क्यांनी खाली आले आहेत. बिर्याणी, पुलाव आणि अन्य पदार्थांसाठी वापरला जाणारा लांब दाण्याचा बासमती तांदूळ केवळ भारत आणि पाकिस्तानमध्येच मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, मध्यपूर्वेतील देशांसाठी बासमती हे मुख्य अन्न असून भारतीय पुरवठ्याला कोणताही खरा पर्याय नाही. युद्ध संपताच हे देश पुन्हा मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.