उत्तरेच्या तीन राज्यांत ४०० रस्ते बंद! जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर

डेहराडून – जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४०० हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि हजारो लोक रस्त्यातच अडकले आहेत. हिमाचलमध्ये मुसळधार पावसाबाबत जारी केलेल्या अलर्टमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
सध्याच्या रेड अलर्ट दरम्यान मंगळवारीही हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडला. चंबाच्या चुराहच्या नेरा येथे ढगफुटीमुळे मेहला येथील घरावर डोंगरावरून दगड पडला. त्यामुळे घरात झोपलेल्या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे तीन जिल्ह्यांतील काही उपविभागांमध्ये शाळा बंद ठेवाव्या लागल्या.
किन्नौरमध्ये, टोंगटोंगचे नाल्यातही पाणी साचले. किन्नौर कैलास यात्रा देखील खराब हवामानामुळे एक दिवसासाठी थांबवावी लागली. राज्यात मुसळधार पावसामुळे सतलजसह सर्व नद्यांना पूर आला आहे. सोमवारी शिमला, कुल्लू आणि कांगडा विमानतळांवर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली.
मंडीमध्ये पुन्हा परिस्थिती
मंडी जिल्ह्यातील सेराजमध्ये पावसामुळे परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. थुनाग, लंबाथाच आणि जरोलमध्ये नाले तुंबल्यामुळे पूर येण्याचा धोका आहे. राज्यात, मंडी-कुल्लू, मंडी-पठाणकोट, शिल्लई-पाओंटा साहिब हे तीन राष्ट्रीय महामार्गांसह 398 रस्ते, 682 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 151 पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प आहेत.
राज्यात विविध ठिकाणी 250 बसेस अडकल्या आहेत. शिमला शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहे. सोमवारी सकाळी कालका-शिमला राष्ट्रीय महामार्ग ५ वर डझनभर ठिकाणी टेकडीवरून दगड आणि ढिगारा पडला.
उत्तराखंडमध्ये कोसळली दरड
उत्तराखंडमधील पिथोरागडमधील पिपलीच्या द्योदा येथे शेळ्या चरायला गेलेला सोबन सिंग (३५) काली नदीत वाहून गेला. चीन सीमेला जोडणारा धारचुला-तवाघाट-लिपुलेख रस्ता दरड फुटल्यामुळे बंद झाला. चोरगलियाच्या शेरनालेमध्ये वाढत्या पाण्यामुळे १० जणांनी भरलेला एक स्कॉर्पिओ वाहून गेला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक लोकांनी त्यांना कसेतरी बाहेर काढले.
चीन सीमेला जोडणारा मलारी महामार्ग १० मीटरपर्यंत खचला आहे. भापकुंडजवळील टेकडीवरून भूस्खलन झाल्यामुळे मलारी महामार्गाचा १० मीटर भाग कोसळला आहे. हा रस्ता चीन सीमा भागाला जोडतो. महामार्ग बंद झाल्यामुळे लष्कराबरोबरच स्थानिक लोकांचीही वाहतूक ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत लष्कर आणि आयटीबीपीच्या वाहनांची वाहतूक थांबली असतानाच, त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या लोकांची वाहनेही दुसऱ्या बाजूला अडकली .
पुंछमध्ये भूस्खलन
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील बैंच कलसा गावात भूस्खलन झाल्यामुळे प्राथमिक शाळेची इमारत पडली. त्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. चार मुले आणि एक शिक्षकही जखमी झाले. दुसरीकडे, सोमवारी चंदीगडसह पंजाबच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला. लुधियाना, पटियाला, पठाणकोट, फिरोजपूर आणि मोहालीसह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे.





