पिंपरी | पेंडिंग बिलाच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक

पिंपरी, (प्रतिनिधी) – गॅस बिल पेंडिंग असल्याचा बहाणा करून वृद्ध व्यक्तीच्या नावावर कर्ज काढत एकूण 39 लाख 87 हजार 990 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 जुलै रोजी दुपारी बावधन, पुणे येथे घडली.
याप्रकरणी बावधन येथील 82 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9038421731 क्रमांक धारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींना फोन करून ‘तुमचे एमएनजीएलचे बिल पेंडिंग आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलचा एक्सेस स्वतःकडे घेतला.
त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 22 लाख 27 हजार 996 रुपये ट्रान्सफर केले. फिर्यादी यांच्या फिक्स डीपॉझीट खात्यातील रकमेवर 17 लाख चार हजार 500 रुपयांचे कर्ज घेतले.
याबाबत समजल्यानंतर फिर्यादी यांनी बँकेस कळवले आणि ते खाते बंद केले. त्यानंतर बँकेने कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम फिर्यादीस दिली. आरोपी फिर्यादी यांची एकूण 39 लाख 87 हजार 990 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.





