ढाका : बांगलादेशात आवामी लीगच्या नेत्यांच्या घरांच्या तोडफोडीनंतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ४० जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाझीपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या या हिंसाचारानंतर बांगलादेशचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांनी देशभर ऑपरेशन डेव्हिल हंट राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आल्याचे गाझीपूरचे पोलीस अधिक्षक जबर सादेक यांनी सांगितले. या सर्वांना जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमधून ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या सर्व खुणा मिटवण्यासाठी विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तोडफोडीसाठी जमा झाले होते. गाझीपूर जिल्ह्यातल्या दक्षिणखान भागात स्वातंत्र्य संग्राम व्यवहारांचे आवामी लीग पक्षाचे माजी मंत्री मोझंम्मल हक यांच्या घरावरील हल्ल्याच्यावेळी स्थानिकांनी या आंदोलकांवरच हल्ला केला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाझीपूरमध्ये निदर्शने आणि निषेध मोर्चा देखील काढला होता. आंदोलनानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उपायुक्त कार्यालयासमोर हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. लुटालूट होऊ नये म्हणून विद्यार्थी कार्यकर्ते माजी मंत्र्याच्या घराजवळ गेले होते. मात्र त्यांच्यावर समाजकंटकांकडून हल्ला झाला, असा दावा विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येतो आहे. मात्र आवामी लीगच्या नेत्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याऐवजी या हिंसाचाराला विरोध करणाऱ्यांच्याविरोधात डेव्हिल हंट ऑपरेशन राबवले जात असल्याची टीका विरोधकांकडून होते आहे. ऑपरेशन डेव्हिल हंट देशभरात राबवणार ऑपरेशन डेव्हिल हंटच्या माध्यमातून अस्थिरता पसरवणाऱ्यांना लक्ष्य केले जाईल. जोपर्यंत या समाज कंटकांना पकडले जाणार नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहिल, असे गृह मंत्रालयाचे सल्लागार मोहंम्मद जहांगीर चौधरी यांनी म्हटले आहे. बांगलादेश लष्कर, हवाई दल आणि नौदल, पोलीस, बॉर्डर गार्ड बांगलादेश, अन्सार आणि तटरक्षक दल यांच्या सदस्यांसह संयुक्तपणे हे ऑपरेशन केले जात आहे.