शिक्रापूरात 4 तर तळेगाव ढमढेरेत 2 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ !

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) सह तळेगाव ढमढेरे परिसरात वारंवार कोरोनारुग्ण आढळून येत असताना आता शिक्रापूर येथे 4 तसेच तळेगाव ढमढेरे येथे 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे कोरोनाबाधित असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कातील त्रिमूर्ती नगर तळेगाव रोड परिसरातील एका घरामध्ये नातीकडे आलेली आजी आजारी असल्याने त्या आजीचा मुलगा तिला भेटण्यासाठी आला. मात्र, आजीकडे आलेला मुलगा स्वतः कोरोनाबाधित असल्याने आणि मुळातच आजी आजारी असल्यामुळे मुलाकडून आजीला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. दोघांना काही त्रास होत असल्याने या आजी व मुलाची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या सल्ल्याने कोरोना तपासणी केली असता त्या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच याच त्रिमूर्ती नगर परिसरातच राहणाऱ्या वारंवार बाहेर प्रवास करणाऱ्या अशा एका युवकाने खबरदारी म्हणून स्वतः तपासणी केली असता त्याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, आणि शिक्रापूर इकोग्राम सोसायटीमध्ये राहणाऱ्या तेरा वर्षीय युवतीला सर्दी खोकला सह काही त्रास होत असल्याने तिच्या पालकांनी तिची कोरोना तपासणी केली असता तिचा कोरोना अहवाल अहवाल पॉझिटिव्ह आला असून शिक्रापूर मध्ये एकाच दिवशी चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा व माशे मळई शेजारील दोघे युवक कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांची कंपनीच्या वतीने कोरोना तपासणी केली असता त्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे परिसरात वारंवार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक व ग्रामस्थ देखील भयभीत झाले आहेत.
तर तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करत फवारणी करण्यात आली आहे. तर शिक्रापूर येथील रुग्णाच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





